तुम्हाला माहित आहे का 1
गेल्या काही वर्षांपासून आपण सीएनजीचं नाव ऐकत आहोत. प्रथम दिल्ली नंतर मुंबई आणि आता अहमदाबाद, पुणे यासारख्या शहरांमध्ये सर्व सार्वजनिक वाहनांसाठी सीएनजीचा वापर अनिवार्य ठरवला गेला आहे. कित्येक खाजगी वाहनंही आता याच इंधनाचा वापर करत आहेत. एवढेच काय पण मुंबई शहराच्या कित्येक भागात स्वयंपाकासाठीही हा वायू आता इंधन म्हणून पुरवला जात आहे. साहजिकच हे इंधन काय आहे आणि ते वापरल्याने नेमका कोणता फायदा होतो हे प्रश्न मनात उभे राहतात.
सीएनजी हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस या त्याच्या संपूर्ण नावाचे लघुरुप आहे. नावावरूनच हा वायू आहे आणि तो नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे हे स्पष्ट होते. पेट्रोल किंवा डिझेल यासारखे खनिज इंधनं जशी आपल्याला जमिनीच्या खाली नैसर्गिक प्रक्रियांमधून तयार होणार्या वनस्पतींच्या जीवाश्मांतुन मिळतात तसाच हा वायूही नैसर्गिक खनिजाच्या रूपातच उपलब्ध असतो. खनिजाच्या रूपात मिळणाऱ्या कच्च्या तेलावर रासायनिक शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्याशिवाय पेट्रोल, डिझेल, केरोसीन वैगेरे इंधने मिळत नाहीत; पण नैसर्गिक वायू मात्र थेट मिळतो. यात बहुतांशी मिथेन वायूचा समावेश असतो. तो ज्वलनशील असल्यामुळे त्याचा थेट वापर करता येतो. मात्र तो ग्राहकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यावर दाब टाकून त्याचे आकारमान कमी करावे लागते. हवेचा सामान्य दाब असताना त्याचे जे आकारमान असते त्याच्या केवळ एक टक्का आकारमानात त्याला बंदिस्त करता करण्यात येते. त्यासाठी त्याच्यावर समुद्रसपाटीवर असणाऱ्या हवेच्या दाबाच्या दोनशे ते अडीचशे पट जास्त दाब द्यावा लागतो. त्याचे आकारमान अशा रितीने आकुंचित केले जात असल्यनेच त्याला कॉम्प्रेस्ड गॅस असे म्हणतात.
त्याची किंमत पेट्रोलच्या तुलनेत कमी असल्याने त्याचा वापर किफायशीर तर ठरतोच पण त्याच्या ज्वलनापायी पेट्रोलपेक्षा ४० ते ५० टक्के कमी कार्बन वायू हवेत सोडला जात असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही तो फायदेशीर ठरतो. शिवाय पेट्रोलमध्ये असणारे शिसे किंवा सल्फर हे पदार्थही त्यात नसतात. साहजिकच त्यांच्यापायी होणारे प्रदूषणही टळतं. हवेपेक्षा तो हलका असल्यामुळे गळती झालीच तर पेट्रोलसारखा जमिनीवर किंवा पाण्यावर साचून राहत नाही. हवेत उडून जातो. शिवाय त्याचा ज्वलनबिंदूही पेट्रोलच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट असल्याने तो सहज सहजी पेटही घेत नाही. त्यामुळे गळती झाल्यानंतरही जरी तो तापलेल्या नळ्यांच्या संपर्कात आला तरी त्यापासून स्फोट होण्याचा धोका संभवत नाही.
जगभर आज त्याचा वाढत आहे. २००९ पर्यंत जगातील जवळजवळ सव्वा कोटी वाहने या इंधनावर चालत होती. याचा सर्वात जास्त वापर भारतीय उपखंडात होत आहे. पाकिस्तान या बाबतीत आघाडीवर आहे; पण आपल्या देशातही आता दहा लाख वाहनांसाठी याच इंधनाचा वापर होत आहे. जसजशी हा वायू पुरवणारी केंद्रं वाढत जातील तसतसा त्याचा वापरही वाढत जाईल.
*डाॅ.बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन*
अणुभट्टीत इंधन म्हणून युरेनियमचा वापर केला जातो. जेव्हा युरेनियमच्या अणूचे विभाजन होते तेव्हा दोन मध्यम भाराच्या मूलतत्त्वांचा उत्पादन होते. बहुतांशी ही मूलतत्त्वे बेरियम व क्रिप्टॉन ही असतात. पण इतरही मुलतत्वांचे उत्पादन होऊ शकते. ही सारी किरणोत्सर्गी असतात व लक्षावधी वर्षे ती तशीच राहू शकतात. त्यांचा इतर काहीही उपयोग नसल्यामुळे त्यांना अणूकचराच मानले जाते परंतु त्यांचे प्रमाण फार नसते. परंतु या अणुविभाजनाच्या अभिक्रियेत इतरही किरणोत्सारी पदार्थांचे उत्पादन होत असते.
निसर्गात जे युरेनियम मिळते त्यात युरेनियमची २३५ व २३८ या दोन अणुभाराची समस्थानके असतात. यापैकी फक्त २३५ अणुभाराच्या युरेनियमच्या अणूंचेच विभाजन होऊ शकते; पण त्यांचे प्रमाण केवळ ७ दशांश टक्के असते. म्हणजे एक किलोग्रॅम युरेनियममध्ये सातशे ग्रॅम असते. उरलेल्या ९९.३ टक्के युरेनियमचे विभाजन होऊ शकत नाही; परंतु या युरेनियमकरवी अतिरिक्त न्यूट्रॉनचे शोषण होत असते. त्यापायी त्याचे किरणोत्सारी प्लुटोनियममध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणजेच उपयोगी अशा संपूर्ण युरेनियमचे विभाजन झाल्यावर उरलेल्या जळीत इंधनामध्ये मोठय़ा प्रमाणावर किरणोत्सारी पदार्थांचा समावेश असतो. या सर्वाला मिळून 'अणुकचरा' असे म्हटले जाते.
वास्तविक ते नाव तसे समर्पक नाही, कारण कचरा संपूर्णपणे टाकाऊ असतो. अणुकचऱ्याच्या बाबतीत हे अंशत:च खरे आहे. कारण या जळीत इंधनावर रासायनिक पुनर्प्रक्रिया करून त्यातून अनेक उपयोगी घटक वेगळे करता येतात. पहिला घटक म्हणजे न जळालेले युरेनियम. यांचे प्रमाण तर सर्वात जास्त असते. किरणोत्सारी प्लुटोनियमचाही इंधन म्हणून वापर करता येतो. अणुभट्टी तसेच अण्वस्त्र दोन्हींसाठी त्याचा वापर होऊ शकतो. तेही या जळीत इंधनापासून वेगळे करता येते. त्याशिवाय इतर काही किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर वैद्यकीय सेवा, शेती तसेच उद्योगधंद्यांमध्ये करता येतो. उदाहरणार्थ कोबाल्ट ६०चा वापर कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जातो. तसेच धातुंमधील जोडकाम व्यवस्थित झाले आहे की नाही याचे परीक्षण करण्यासाठीही केला जातो.
हे सारे उपयु पदार्थ त्या जळीत इंधनामधून वेगळे केल्यावर जे काही उच्छिष्ठ उरतं त्याला खऱ्या अर्थाने अणुकचरा असेही म्हणता येईल. त्याचे प्रमाण फारसे नसते.
याची विल्हेवाट लावण्याचे तंत्रज्ञानही विकसित झालेले आहे. घनकचरा वितळवुन त्याचे काचेच्या गोळीत रूपांतर करून तो जमिनीखाली सिमेंट काँक्रिटच्या जाड जाड भिंती असलेल्या विहिरींमध्ये गाडला जातो. द्रवरुप कचरा पातळ करून तो नि:सारित केला जातो. आपल्या देशानेही हे तंत्रज्ञान स्वबळावर विकसित करून आत्मसात केलेले आहे.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*
आपल्या डोळ्यांवर आघात करत नाही, मग इजा करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण सूर्याच्या बाबतीत खरे नाही. त्यामुळे सूर्यावरचा डाग तसा आपण सहजगत्या पाहू शकत नाही. पण जर योग्य अशा दुर्बिणीची मदत घेतली तर आपल्याला हे डाग दिसू शकतात.
तरीही दुर्बिणीचा शोध लागण्यापूर्वी प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी या डागांची माहिती संकलित केली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पण त्यांची अधिक चांगली ओळख सर्वप्रथम गॅलिलिओने सतराव्या शतकातच करून दिली. दुर्बिणीचा शोध लावल्यानंतर गॅलिलिओने आकाशातल्या सर्वच गोलांवर ती रोखायला सुरुवात केली. त्यामुळेच त्या आकाशातील ग्रहताऱ्यांसंबंधी अधिक माहिती आपल्याला मिळत गेली. त्यातच सूर्यावरच्या या डागांचा पत्ता लागला.
तेव्हापासून खगोलशास्त्रज्ञ या डागांचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना संपूर्ण यश मिळालेले नसले तरी जी काही माहिती आजवर मिळालेली आहे त्यावरून या डागांची उत्पत्ती आणि त्यांचे स्वरूप याविषयी काही आराखडे बांधणे शक्य झाले आहे. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या भट्ट्या सतत धडधडत असतात. त्यामुळे त्याचे तापमान कोट्यावधी अंश सेल्सियस इतके असते. त्या तापमानाला त्याच्या अंतरंगातल्या सर्वच वायूंचे प्लाझ्मा अवस्थेत रूपांतर होते. त्या अवस्थेतला पदार्थ लाव्हारसासारखा द्रवरूप तर असतोच पण त्यातल्या रेणूंचे घटक असलेले मुलकणही स्वतंत्र झालेले असतात. या मूलकणांवर विद्युतभार असतो. त्यात ते सतत वेगाने इतस्तत: भटकत राहतात, त्यामुळे त्यांच्या ठायी चुंबकीय गुणधर्मही असतो. त्यापायीच मग सूर्याच्या अंतरंगात तीव्र असे चुंबकीय क्षेत्रा तयार होते. तेही स्थिर नसते तर त्याचे सतत चलनवलन होत राहते. साहजिकच या चुंबकीय क्षेत्राला पीळ पडतो. हा पीळ अधिक ताणला गेला की सूर्याच्या बाह्य आवरणाला छेद देऊन वर प्रकट होतो. सूर्याच्या प्रकाशमान अशा त्या आवरणाला जिथे छेद जातो तिथे साहजिकच मग प्रकाश लोप पावल्यासारखा होऊन काळसर ठिपका उमटतो. हाच सौरडाग. या सौरडागांचे तापमान आसपासच्या तापमानापेक्षा कमी असते, त्यामुळेच त्याचा प्रकाश फिकुटल्यासारखा होऊन तो इतर धगधगीत प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर काळसर ठिपक्यासारखा दिसतो. अर्थात तापमानातली ही घट तौलनिकच असते. त्यामुळे तिथले तापमानही तसे चढेच असते.
सौरडागही तसे स्थिर नसतात. कारण चुंबकीय क्षेत्रातल्या सततच्या चलनवलनापोटी ते निर्माण झालेले असतात. त्यामुळे कधी त्यांची संख्या वाढलेली असते तर कधी त्यांच्यात घट होते. सौरडागांचे हे रहाटगाडगे अकरा वर्षांचे असते. जेव्हा हे चक्र उच्च स्थितीला पोहोचते तेव्हा सौर डागांची संख्या कमाल पातळी गाठते. उलट हे चक्र सर्वात खालच्या स्थितीला पोहोचते तेव्हा हीच संख्या किमान पातळीवर येते.
*डॉ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*
No comments