Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

तुम्हाला माहित आहे का? 2

🔼अँड्रॉइड फोन काय करतो ?🔼

एखादे उपकरण किंवा एखादी सुविधा उपलब्ध झाली की तिचा विकास होत तीच्या मार्फत अधिकाधिक सुविधा सेवा मिळाव्यात अशी इच्छा होत राहते. टीव्ही आला, तेव्हा तो कृष्णधवल होता. एकच वाहिनी होती. दिवसातून तीन चार तासच कार्यक्रम प्रक्षेपित होत. मग रंगीत झाला, अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले. दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस कार्यक्रम मिळू लागले. मग तो टेबलावर न ठेवावा लागता भिंतीवर लटकवता येऊ लागला. आता त्याला डिव्हिडी प्लेअरची जोड मिळाली. त्यात इंटरनेटचाही समावेश झाला. तो त्रिमितीही झाला. एक ना अनेक.


 मोबाईल फोनच्या बाबतीतही तशीच परिस्थिती उद्भवली. केवळ ध्वनीच नाही तर लेखी संदेश दृश्य चित्र तेही चलचित्र त्याच्या माध्यमातून पाठवणे शक्य होऊ लागले. त्याचा हा विस्तार वाढविण्यासाठी मग त्यातच इंटरनेटचाही अंतर्भाव करण्यात आला. त्यासाठीच गुगल या कंपनीने अँड्रॉइड नावाची एक नवीन मंत्रावली, सॉफ्टवेअर विकसित केले. ते त्या फोनचे नियंत्रक म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम बनले आहे. या मंत्रावलीवर चालणाऱ्या मोबाइल फोनला अँड्रॉइड फोन असे म्हणतात. ही मंत्रावली ज्याच्या आधारावर बनवली गेली आहे ती सांकेतिक भाषा, कोड, गुगलने गुप्त न ठेवता सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे मग त्याच्याशी सुसंगत अशा अनेक नवनवीन सेवा, खेळ तयार करणे शक्य होऊ लागले. त्यातच गुगलने तर अशी नवनवीन ॲप्लिकेशन्स तयार व्हावीत याला उत्तेजन द्यायलाच सुरुवात केली. त्यामुळे मग या अँड्रॉइड फोनची व्याप्ती दिवसागणिक वाढू लागली. नवनवीन अॅप्लिकेशन्स तयार झाली कि तीही विनामूल्य आपल्या फोनवर उतरवून घेण्याची सुविधाही मिळू लागली. साधा फोन स्मार्टफोन बनला.


 आता या अँड्रॉइड फोनचा वापर केवळ संभाषणापुरता किंवा एसएमएसपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याच्या माध्यमातून चलचित्र तर पाठवता येतातच, पण त्याचा उपयोग व्हिजिफोनसारखा म्हणजेच ज्याच्याशी बोलायचे त्याची छबी फोनवर दिसू शकेल अशा रीतीने संभाषण करता येते. समोरासमोर उभे राहून एकमेकांशी बोलण्याचे समाधान देऊ शकते. या फोनमधून इंटरनेटची संपूर्ण सुविधा, ई मेल सकट उपलब्ध होते. त्यामुळे मग घरापासून दूर असतानाही ई मेल मिळत राहते. आपल्या घरचा संगणक ज्या ज्या गोष्टींसाठी वापरला जातो त्या सर्व आता या हातात मावणाऱ्या अँड्रॉइड फोनवर करता येतात. एवढेच काय पण काही वर्तमानपत्रे, पुस्तके या फोनवर मिळू शकतात. ऑफिसमध्ये जाता जाता वर्तमानपत्र वाचता येते. प्रवासात पुस्तके वाचून अभ्यास करता येतो. यूट्यूबसारख्या सुविधांमधून क्रिकेटचा सामनाही पाहता येतो. थोडक्यात सार्‍या जगाशी सततचा संपर्क साधता येतो.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*

🔼 काय सांगतो हाॅक आय ?🔼

वर्ल्डकपचा सामना टीव्हीवर पाहत असतो. सामना एका नाजूक अवस्थेला पोहोचलेला असतो. आपल्या संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात तेरा धावांची आवश्यकता असते. धोनी खेळआपण त असतो. पहिलाच चेंडू त्याच्या पॅडवर आदळतो. विरुद्ध संघाचे अकराच्या अकरा खेळून जोरदार अपील करतात, हाऊज दॅट ! अंपायर अजूनही निश्चल असतो. खेळाडू आता आपल्या अपिलाची पट्टी आणखी वर चढवतात. त्याच्या जोडीला हातवारेही करायला लागतात. आपला श्वास घशातच अडकतो.

धोनी बाद आहे की नाही ? त्याच्या पायावर लागलेला चेंडू पुढे जावून यष्टींवर पडणार होता की नाही ? अंपायरला याचाच फैसला करायचा असतो. तो करणे त्याला कठीण जात असते.


 तिकडे सामन्याचे समालोचन करणारी मंडळी आपल्या वातानुकुलीत खोलीत बसून चर्चा करत असतात. एक जण एका बाजूने बोलतो दुसरा त्यावर शंका करतो. मग कोणीतरी म्हणते आपण हॉक आयलाच विचारुया ना. पुढच्या क्षणी हाॅक आयने केलेले चित्रण दाखवायला सुरुवात होते. त्यावरून चेंडू यष्टींवरुन पलीकडे गेला असता हे स्पष्ट होते. म्हणजे धोनीचा पाय यष्टीसमोर होता हे खरं; पण तो चेंडू यष्टींना लागला नसता हेही खरं. मैदानावरच्या मोठ्या पडद्यावरही हे दाखवले जाते. तोवर पंचाचा निर्णय लागलेला असतो. नाबाद. प्रेक्षक जल्लोष करून सोडतात. अर्थात पंचाचा निर्णय हाॅक आयच्या मदतीविना केलेला असतो. म्हणूनच समालोचक सांगतात, ए व्हेरी गुड डिसिजन.


 हॉक आय हे समालोचनात रंगत आणणारे एक नवीन तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये उपलब्ध झालेले आहे. त्याचा शोध डॉक्टर पॉल हॉकिन्स यांनी लावला. हॉकिन्स स्वतः उत्तम खेळाडू आहेत. ते मैदानावर निरनिराळ्या ठिकाणी लावलेल्या सहा वेगवान कॅमेऱ्यांचा वापर करून प्रत्येक चेंडूचे तो गोलंदाजाच्या हातातून सुटल्या क्षणापासून चित्रण करत राहतात. हे चित्रण सेकंदाला अनेक फ्रेम या वेगाने होते. या चित्रणाचे एका मिनिटात कोट्यावधी गणितं सोडवू शकणाऱ्या संगणकाकडून संकलन केले जाते. हे चित्रण चार मितीचे असते. म्हणजे त्या चेंडूचे अवकाशातले नेमके स्थान निश्चित करण्यासाठी लागणाऱ्या लांबी, रुंदी आणि उंची या तीन मिती आणि त्यांच्या जोडीला काळाची चौथी मिती. त्यामुळे कोणत्याही एका क्षणी तो चेंडू नेमका कुठे असेल याचे चित्र आपल्यापुढे उभे राहते.


 या चित्रणाच्या आधारावर मग त्या चेंडूचा प्रवास कसा होणार आहे हे समजून घेणे सहज शक्य होते. शिवाय हे चित्रण साठवूनही ठेवले जाऊ शकते. त्यामुळे समालोचक त्यानंतर फुरसतीच्या वेळातही ते दाखवू शकतात.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*


🔼 ब्लॅक बॉक्स काय सांगतं ?🔼

अपघात होतो, विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटतो. काही वेळानं ते विमान कुठंतरी कोसळतं. त्या अपघातस्थळी पोचल्यानंतर त्या विमानाच्या अवशेषांच्या शोधाबरोबर कोणी प्रवासी वाचला आहे की काय याचा शोध तातडीनं घेतला जातो, पण त्याचबरोबर त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोधही कसोशीनं घेतला जातो.

खरं तर असे एक नाही, तर दोन ब्लॅक बॉक्स प्रत्येक विमानात असतात. आणि त्यांचं ब्लॅक बॉक्स हे नावही चुकीचं आहे, कारण त्याचा रंग भगवा किंवा नारिंगी असतो. कितीही उंचीवरून विमान कोसळलं असलं, जमिनीवर अथवा पाण्यात पडलं असलं, त्यानं पेट घेतला असला किंवा त्याच्यावर कितीही दाब पडला असला, तरी या दोन्ही पेट्या त्यातून तावून-सुलाखून निघून शाबूत अवस्थेत असतील अशीच त्यांची बांधणी केलेली असते. एवढी काळजी घेतली जाते किंवा त्यांचा शोधही तत्परतेनं घेतला जातो, कारण त्या पेट्यांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती नोंदलेली असते. त्या माहितीवरून विमानाच्या प्रवासाच्या त्या शेवटच्या क्षणांमध्ये कोणत्या घडामोडी झाल्या याची माहिती मिळून ते कोसळण्याची कारणं समजून येऊ शकतात.

एका पेटीमध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो. त्यात विमानाच्या उड्डाणासंबंधीची अनेक तपशीलवार माहिती सतत नोंदली जात असते. पूर्वी जेव्हा जुन्या टेप रेकॉर्डरप्रमाणे चुंबकीय फितीवर ही माहिती मुद्रित केली जात असे, तेव्हा साठवली जाणारी माहिती मर्यादित असे. पण आता संगणकाप्रमाणे सॉलिड स्टेट मेमरी यंत्रणा वापरली जात असल्यामुळं पुष्कळ माहिती साठवता येते. त्यात वेळ, विमानानं गाठलेली उंची, बाहेरील तापमान, हवेचा दाब, हवेतून जाण्याचा विमानाचा वेग, जर विमान उंची बदलत असेल तर त्याचा वेग, इंधनाचा वाहनाचा वेग आणि स्वरूप, यासारख्या माहितीची दर क्षणाला नोंद केली जाते. याव्यतिरिक्त विमानाच्या नियंत्रणचाकाची स्थिती, ब्रेकची स्थिती, त्याला वेग देणाऱ्या यंत्रणेची स्थिती, त्याचं संतुलन राखणाऱ्या यंत्रणेची स्थिती अशा किमान व जास्तीत जास्त वेगवेगळ्या परिमाणांची नोंद सतत होत असते. त्यासाठी विमानाच्या इंजिनासकट निरनिराळ्या भागात संवेदक बसवलेले असतात आणि ते फ्लाईट डेटा रेकॉर्डरला जोडलेले असतात. त्यामुळं कोणाच्याही मदतीविना स्वयंचलितरीत्या ही नोंद होत राहाते.


दुसऱ्या पेटीत कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असतो. हा विमानाच्या कॉकपिटमध्ये म्हणजेच नियंत्रण कक्षात होणाऱ्या निरनिराळ्या आवाजांची सतत नोंद ठेवत राहातो. त्यासाठी किमान चार निरनिराळे मायक्रोफोन कॉकपिटमध्ये निरनिराळ्या ठिकाणी लावून ठेवलेले असतात. त्यात पायलट आणि को-पायलट यांनी केलेल्या संभाषणाची नोंद तर होत राहतेच.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन*



No comments