तुम्हाला माहित आहे का? 3
भांडं आपण कशासाठी वापरणार आहोत यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. जर भांडं नुसतंच पाणी भरून ठेवण्यासाठी किंवा उरलेलं शिजलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी वापरणार असू, तर मग त्याला तांब्याचा तळ असला काय नि नसला काय, काहीही फरक पडणार नाही. पण जर आपण ते भाडं एखादा पदार्थ शिजवण्यासाठी करणार असू, तर मात्र त्याचा फायदा निश्चितच होईल.
माणूस पदार्थ शिजवून खायला लागल्यापासून ते आजपर्यंत त्यासाठी वापरायच्या भांड्यांमध्ये उत्क्रांती होत गेली आहे. माणसाच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा त्याच्याशी संबंध आहे. सुरुवातीला मातीचीच भांडी वापरली जात होती. अश्मयुगातून माणूस ब्रॉन्झयुगात आला तेव्हा त्याला धातू कसे तयार करायचे, एवढंच काय पण ब्रॉन्झसारखा मिश्र धातू कसा बनवायचा याविषयीचं तंत्रज्ञान अवगत झालं. त्याचबरोबर त्या धातूला वाकवून निरनिराळे आकार द्यायलाही तो शिकला होता. त्यामुळं धातूची भांडी बनवायला सुरुवात झाली. याच भांड्यांचा वापर पदार्थ शिजवण्यासाठीही होऊ लागला. एक तर ही भांडी फुटत नसत. घासून-पुसून स्वच्छ करता येत. त्यामुळं ती वरचेवर वापरता येत असत.
मग या भांड्यांचा शिजवलेल्या पदार्थांवर काही अनिष्ट परिणाम होणार नाही याचाही विचार होऊ लागला. त्यानुसार चांदी, सोनं, तांब, पितळं यांची भांडी वापरात आली. त्यापैकी चांदी आणि सोनं हे उत्तम धातू असले तरी ते मौल्यवानही होते. त्यामुळं ते सहजासहजी परवडणारे नव्हते. त्यामुळं राजेरजवाडे सोडले तर सामान्यजनांकडे नेहमीच्या वापरासाठी तांबं किंवा पितळ यांचा वापर होऊ लागला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पितळेच्याच भांड्यांचा वापर पदार्थ शिजवण्यासाठी होत होता. पण या भांड्यांमुळं खाद्यपदार्थ विषारी बनण्याचा धोका होता. त्यासाठी त्या भांड्यांना कल्हई काढून त्यांच्या आतल्या पृष्ठभागावर कथिलाचा थर द्यावा लागे.
या सुमारास स्टेनलेस स्टीलचा उदय झाला. या धातूमध्ये पितळेच्या दोषांपैकी एकही दोष नव्हता. तरीही पदार्थ शिजवताना इंधनातून मिळालेली आगीची उष्णता पदार्थापर्यंत वाहून नेण्याची आवश्यकता होती. त्यामध्ये मात्र स्टेनलेस स्टील मार खात होतं. कारण त्याची उष्णतावाहकता केवळ १६च होती. चांदीच्या ४१० किंवा सोन्याच्या ३०५च्या तुलनेत ती नगण्यच होती. पितळेची उष्णतावाहकताही ११० होती. त्यामुळे पदार्थ शिजवण्यासाठी कितीतरी जास्त इंधनाची आवश्यकता भासू लागली. पदार्थ
शिजायलाही वेळ लागू लागला. यावर मात करण्यासाठी मग ४१० उष्णतावाहकता असलेल्या तांब्याचा तळ त्या भांड्यांना जोडायचा उपाय पुढं आला. त्यामुळं आगीची उष्णता वेगानं पदार्थाला मिळू लागली. इंधनाची बचत तर झालीच, पण पदार्थ शिजायला लागणारा वेळही कमी झाला.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन*
हास्य ही एक निर्मळ आणि सार्वत्रिक भावना आहे. माणसामाणसांमधील संवादाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे. अशा प्रकारच्या संवादासाठी लागणारी भाषा आपल्याला शिकावी लागते. मग ती मराठीसारखी मातृभाषा असो की इंग्रजीसारखी परकी भाषा असो. हास्य मात्र शिकावं लागत नाही. ते उपजतच प्रत्येकाच्या ठायी असतं. मूल साधारण साडेतीन-चार महिन्यांचं झालं की ते हसू लागतं. आपल्या आईबरोबर आणि इतर आप्तांबरोबर नातं प्रस्थापित करण्याचं शिशूचं ते एक साधन असतं. त्यामुळेच हास्य हे नेहमी उत्स्फूर्त असतं. म्हणजे तसं आपण ठरवून हसू शकतो पण ते हास्य निर्मळ नसतं किंवा इतरांशी नातं जोडणारं नसतं. अशा कृत्रिम हास्यापोटी नकारात्मक प्रतिसादच उत्पन्न होतो. उत्स्फूर्त हास्यापोटी सकारात्मक प्रतिसादच मिळतो. व्यक्ती-व्यक्तीतील सामाजिक दृढ व्हायला त्यामुळे मदत मिळते. हास्यातून आपण इतरांना एक सकारात्मक संदेश पाठवत असतो. त्यामुळेच माणूस एकटाच असताना सहसा हसताना आढळत नाही. एखादं विनोदी पुस्तक वाचत असताना किंवा एखाद्या विनोदी प्रसंगाची आठवण होऊन माणूस एकांतात हसेल. एरवी एकांतात तो जसा आपल्याशीच बोलत नाही तसाच तो आपल्याशी हसतही नाही.
हसताना आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची बरीच हालचाल होते. ते नवा आकृतिबंध धारण करतात. त्याला आवाजाचीही साथ मिळते पण हास्याच्या प्रकारानुसार शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंचाही त्यात सहभाग असतो आणि या साऱ्याचं नियंत्रण मेंदूमधील निरनिराळ्या भागांकडून केलं जातं. सहसा आनंदाच्या भावनेला जागृत करणाऱ्या मेंदूमधील सगळ्या प्रक्रिया हास्याच्या वेळीही होत असतात. थोडक्यात, हास्यापोटी आनंदाच्या भावनेनं मन आणि शरीर उचंबळून येतं.
विनोदापोटी आपण हसतो, असा एक समज आहे. चांगल्या विनोदापोटी हास्य उमलत असलं तरी हास्य उमलण्यासाठी विनोदाची गरज असतेच असं नाही. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील मज्जाशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हाईन यांनी यासाठी एक सर्वेक्षणच केलं. तेव्हा अरे जॉन, होतास कुठं तू, ही पहा मेरी आली किंवा तुमच्याकडे एखादा रबरबँड मिळेल काय यांसारख्या साध्यासुध्या वाक्यांपोटीही हास्य उत्पन्न झाल्याचं त्यांना दिसून आलं. म्हणजेच त्या हास्याचा उगम विनोदात नसून ती एक उत्स्फूर्तपणे उमटलेली अभिव्यक्ती होती.
त्यामुळेच आपलं हास्य हा उत्क्रांतीचा वारसा आहे
की काय, अशी शंका काही मानववंशशास्त्रज्ञांना आली होती. तो आपला सांस्कृतिक उत्क्रांतीचा ठेवा आहे, असं महादेव आपटे यांचं मत आहे. पण मनुष्यप्राण्याशिवाय इतर प्राण्यांना हसता येत नाही. म्हणजे त्यांना गुदगुल्या केल्या तर त्याची प्रतिक्रिया उमटते; पण ती वेगळी असते. चिम्पांझीसारख्या मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या प्रवाहातल्या सर्वात जवळच्या नातेवाईक प्राण्याला गुदगुल्या केल्यास तो धाप लागल्यासारखा प्रतिसाद देतो. इतर काही
प्राण्यांच्या तोंडून अशा वेळी काही चीत्कारही उमटतात. त्याचंच रूपांतर हास्यात झालं असावं, असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे.
हास्यापोटी शरीरक्रियांमध्ये काही चांगले प्रतिसाद उमटतात आणि त्यांची आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
त्यामुळंच लाफ्टर क्लब'सारखे काही उपक्रम चालू आहेत. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन' म्हणतात ते यापोटीच. तरीही आपण का हसतो, हे एक गूढच राहिलं आहे. त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*
अलीकडे आलेली केवळ आकड्यांनी वेळ दाखवणारी डिजिटल घड्याळं सोडली तर इतर घड्याळांमध्ये तास काटा, मिनिट काटा असे दोन काटे असतातच. काहींमध्ये तर तिसरा सेकंद काटाही असतो. हे सगळे काटे डावीकडून उजवीकडे फिरत असतात. आता ते सतत गोलाकारच फिरत असल्यामुळे या प्रकारच्या प्रदक्षिणेला घटीवत आणि त्याच्या उलट उजवीकडून डावीकडे फिरण्याला अवघटीवत असं म्हटलं जातं.
म्हणा काहीही, पण प्रश्न उरतोच. हे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ते उलट्या दिशेनं फिरले तर वेळ दाखवू शकणार नाहीत, असं थोडंच आहे. तासांचे व मिनिटांचे आकडे तबकडीवर उलट्या दिशेनं दाखवले म्हणजे काम झालं पण तसं होताना दिसत नाही. मग याचं कारण काय असेल खरं तर ती एक प्रथा आहे. काळ मोजायला सुरुवात केली गेली तेव्हा असणाऱ्या व्यवस्थेची ती एक राहिलेली खूण आहे.
आपण दिवसाची सुरुवात सूर्योदयाबरोबर झाली असं मानतो. त्यानंतर किती काळ उलटून गेला आहे, हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वाळूचं घड्याळ तयार करण्यात आलं पण त्याच्या मदतीनं संपूर्ण दिवसाचं कालमापन करायचं तर अगडबंब घड्याळ तयार करावं लागलं असतं. तेव्हा मग गावाच्या मध्यभागी एक उंचच उंच खांब उभा करून त्याची सावली मोजण्याची कल्पना लढवली गेली. हे खांब वरवर जाताना निमुळते होत गेलेले असत. इजिप्तमध्ये पहिल्यांदा त्यांचा वापर करण्यात आला. त्यांना ओबेलिस्क असं म्हणत.
आपण त्याला ‘कालमनोर म्हणू शकू.
सूर्योदयाच्या वेळी त्याची सावली लांबलचक पसरलेली असे पण जसजसा सूर्य वर येऊ लागे तसतशी त्या सावलीची लांबी कमी कमी होत माध्यान्हीच्या वेळी तर ती त्या खांबाच्या पायथ्याशीच घुटमळत राही. सूर्य कलू लागला, की परत त्या सावलीची लांबी वाढत वाढत सूर्यास्ताच्या वेळी ती लांबलचक होई. सावलीच्या लांबीवरून मग किती काळ उलटला आहे, हे मोजता येई.
या ओबेलिस्कच्या कल्पनेचाच वापर करून मग छोट्या तबकड्यांची, सहज आपल्याबरोबर नेता येतील अशा धातूच्या तबकड्यांची घड्याळं तयार करण्यात आली. त्यात गोलाकार तबकडीच्या मध्ये एक त्रिकोणी पट्टी बसवलेली असे. तिच्या सावलीच्या लांबीवरून वेळ मोजण्यात येई. हिला ‘सूर्यतबकडी असं म्हणत.
सूर्य पूर्वेला उगवत असल्यानं खांबाची सावली पहिल्यांदा पश्चिमेच्या बाजूला पडे. मग दिवसभरात तिचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होत असे. आता नकाशात आपण पश्चिम दिशा डावीकडे दाखवतो. म्हणजेच त्या सावलीचा प्रवास हा डावीकडून उजवीकडे असा होत असे. दिवसातली वेळ टळण्याचा आणि सावलीचा प्रवास डावीकडून उजवीकडे होण्याचा संबंध डोक्यात इतका पक्का भिनला होता, की मग काट्यांची घड्याळं तयार केली गेली तेव्हा त्या काट्यांचा प्रवासही असाच डावीकडून उजवीकडे होईल, अशी व्यवस्था केली गेली. कालगणनेच्या इतिहासाची ती अशी एक पाठी राहिलेली निशाणीच आहे.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*
No comments