Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

तुम्हाला माहित आहे का?4

🔻नद्या नागमोडी वळण का घेतात ? 🔻

नद्यांचा उगम डोंगरराजीमध्ये म्हणजेच उंचावर होतो. तिथून त्या उताराकडे वाहत जातात. जोवर हा उतार असतो तोवर त्यातील उंचवटे आणि सखल भाग यांच्या साथीनं त्या वाह । राहतात; पण जेव्हा त्या सपाट प्रदेशातून वाहू लागतात तेव्हा त्यांचा प्रवाह निर्धारित करणारे दुसरेच घटक प्रबळ होतात. यातल्या दोन प्रमुख घटकांचा प्रभाव प्रवाहाचं स्वरूप निश्चित करण्यात होतो. नद्याच्या वाहण्यामुळं पाण्याचं काठावरच्या तशाच तळाशी असलेल्या मातीशी घर्षण होतं. त्यामुळे मग त्या मातीची धूप होते. उलट काठावरचा गाळ नद्यांच्या तळाशी साचून राहतो. नदीचा प्रवाह जरी सलग भासला तरी सर्वच पाणी एकाच वेगानं वाहत नसतं. याला परत तळामध्ये तसंच काठावरच्या प्रदेशातील उंचवटे आणि सखल भाग कारणीभूत असतात. ज्या बाजूचा प्रवाह वेगानं वाहतो त्या बाजूकडची धूप होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो भाग अधिक खोल बनतो. त्या बाजूच्या पाण्याला अधिक वेग येतो. त्यापायी धूप आणखीच वाढते. उलट ज्या बाजूच्या प्रवाहाचा वेग कमी असतो त्या बाजूकडे गाळ साचून राहण्याचं प्रमाण वाढीस लागतं. त्या बाजूचा तळ उथळ होतो. प्रवाहाच्या वेगाला अधिक अटकाव होतो. तो आणखी कमी होतो. जास्त गाळ साचून राहू लागतो. अशा रीतीनं नदीच्या तळाचा उतार वाढला, की ज्या बाजूला जास्त उतार आहे त्या बाजूला प्रवाह वळतो. सायकलीवरून जाताना जर गुळगुळीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताळ भागात पुढचं चाक गेलं तर त्याचा वेग कमी होतो. सायकल त्या बाजूला झुकते, म्हणजेच दोन चाकांच्या वेगात फरक पडला, की सरळ वाट सायकल सोडून देते. तशातलीच नदीच्या प्रवाहाची गत होते. फरक इतकाच, की ज्या बाजूच्या प्रवाहाची गती जास्त झालेली असते त्या बाजूकडे प्रवाह झुकतो. कारण आता उतार त्या दिशेला वाढलेला असतो. तसा तो प्रवाह झुकला की विरुद्ध बाजूच्या पाण्याला तेवढ्याच वेळात जास्त अंतर काटावं लागतं. त्याचा वेग वाढतो. त्यापायी होणारी धूप वाढते. तशी ती वाढली की आता उताराची दिशाही बदलते. त्यामुळे मग प्रवाह विरुद्ध बाजूला झुकतो. वळण विरुद्ध बाजूकडे झुकतं. ज्या प्रदेशातून अशा वेळी नदी वाहत असते त्या प्रदेशात नैसर्गिक उतार नसल्यामुळे प्रवाहापोटी उद्भवणाऱ्या चढाव- उतारांमधील सततच्या दिशाबदलाची संगत करत नदी वाहत राहते.

साहजिकच तिचा प्रवाह नागमोडी वळणं घेत राहतो.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*

🍎 कापलेलं सफरचंद तपकिरी का होतं?


सफरचंदासारख्या फळांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. लोखंडाचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क आला, की त्याचं लोखंडाच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच त्याला गंज चढतो. त्या गंजाचा तपकिरी रंग मग त्या कापलेल्या सफरचंदाच्या पृष्ठभागावर उतरतो, असं आपल्याला गितलं जातं; पण ते अर्धवटच खरं आहे. प्रत्यक्षात होणाऱ्या प्रक्रिया अधिक गुंतागुंतीच्या आहेत. हा तपकिरी रंगाचा डाग केवळ सफरचंदावरच पडतो असे नाही. पेअरवरही तो पडतो. बटाट्यावरही पडतो. तरीही तसा तो पडण्याचं कारण काय, हा प्रश्न उरतोच, सफरचंद जेव्हा आपण कापतो तेव्हा एक तर त्याचा अंतरंगावरचा पृष्ठभाग आपण उघडा करतो. त्याचा हवेशी संपर्क येऊ देतो. तसंच त्या पृष्ठभागावरच्या उतींना आणि त्यांचे घटक असणाऱ्या पेशींनाही काही इजा करतो. त्यामुळे त्या इजा झालेल्या पेशींमध्ये ऑक्सिजनचा शिरकाव होतो. या फळांमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज नावाचं एक विकर असतं. जेव्हा पेशीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं तेव्हा फळात मुळातच असलेल्या फेनॉलच्या संयुगांचं ओक्विनोन नावाच्या संयुगांमध्ये रूपांतर होतं. ही संयुगं रंगहीन असतात; पण तपकिरी रंगाच्या रसायनांची ती पूर्वसूरी असतात. म्हणजेच त्यांची प्रथिनांचे घटक असणाऱ्या अमिनो आम्लांशी प्रक्रिया झाली, की त्यातून तपकिरी रंगाची रसायनं तयार होतात. काही वेळा या ओक्विनोनच्या साखळ्या तयार होऊन त्यापासून बहुवारिक संयुगं तयार होतात. त्यांचाही रंग तपकिरी असतो.

सर्वच जातींच्या सफरचंदांमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज हे विकर असत; पण त्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. तसंच त्याचा प्रभाव ज्यांच्यावर पडायचा ती फेनॉलची संयुगंही वेगवेगळ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्या दोन्हींच्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये होणारी प्रक्रिया किती जोमदार आहे व तिच्यातून तयार होणाऱ्या ओक्विनोनचं प्रमाण किती असेल हे ठरतं. त्यामुळे काही जातींची सफरचंदं चटकन तपकिरी होताना दिसतात, तर काही त्या मानानं संथ गतीनं आणि कमी प्रमाणात तो रंग धारण करताना दिसतात. या प्रक्रियेतल्या दोन घटकांचं प्रमाण कमी-जास्त करणं तर शक्य नसतं; पण त्यांच्यामध्ये होणारी प्रक्रिया सहजासहजी होणार नाही, तिच्यामध्ये बाधा येईल अशी व्यवस्था करणं शक्य असतं. कापलेल्या फळांवर साखरेचा किंवा तिच्या पाकाचा लेप दिला तर हवेतल्या ऑक्सिजनचा पेशींमध्ये होणारा शिरकाव आपण टाळू शकतो. निदान त्याचं प्रमाण कमी करू शकतो. लिंबाच्या किंवा अननसाच्या रसामध्ये अॅन्टिऑक्सिडन्ट पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तेही हवेतल्या ऑक्सिजनच्या

शिरकावात अडथळा निर्माण करू शकतात. शिवाय ते दोन्ही पदार्थ आम्लधर्मी असल्यामुळं त्या विकराच्या प्रभावाला रोखू शकतात. तसं केल्यास कापलेल्या सफरचंदाचं 'गंजणं' आपण काही प्रमाणात कमी करू शकतो.


🔼भिजलेल्या कपड्याचा रंग गडद का दिसतो?🔼

धुतलेला कपडा पिळून त्यातलं पाणी काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही पाणी उरतंच. असा ओला कपडा मग दोरीवर घालून आपण सुकवत ठेवतो. त्या वेळी जरा बारकाईनं लक्ष दिलंत तर दिसून येईल, की तो कपडा रंगीत असेल तर ओला असताना त्याचा रंग गडद दिसतो; पण सुकला की पुन्हा आपला मूळचा हलका रंगच तो परिधान करतो. पावसात भिजल्यामुळं ओल्या झालेल्या कपड्यांचा रंगही गडद झालेला दिसतो. ही किमया कशी घडते?

सुती कपडा कापसाच्या धाग्यांपासून तयार केलेला असतो. कापसाचा धागा हा एक नैसर्गिक धागा असून जेव्हा ते धागे उभे-आडवे धरून गुंफले किंवा विणले जातात तेव्हा त्यांची ही गुंफण तशी सैलसरच असते. त्या धाग्यांमध्ये भरपूर पोकळी असते. त्या पोकळीत हवा भरून राहते. शिवाय हे धागे तेवढे गुळगुळीत नसतात. त्यांचा पृष्ठभाग तसा ओबडधोबडच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांच्यावर प्रकाशकिरण पडतात तेव्हा त्यांचा बराचसा अंश त्या पृष्ठभागावरून विखुरला जातो. तुलनेनं कमी अंश परावर्तित होतो. असा परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचा रंग फिकट असल्याचं आपल्याला दिसतं.

जेव्हा हाच कपडा ओला होतो तेव्हा पाणी त्याच्यात शिरतं. ते धाग्यांमधल्या पोकळीतल्या हवेची हकालपट्टी तिथं साचून राहतं. त्यामुळं मग त्या धाग्याच्या पृष्ठभागावरून विखुरणाऱ्या प्रकाशकिरणांचं प्रमाण कमी होतं. आता जास्त किरण धाग्यावरून परावर्तित होतात. अधिक प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. रंग गडद झाल्याचा आभास निर्माण करतो. तेच पाणी निघून गेलं, की पूर्वीसारखी हवा धाग्यांमधल्या पोकळीतली आपली जागा पटकावते. परत एकदा जास्त प्रकाश विखुरला जातो.

रेशीम किंवा पॉलिएस्टरसारखे

कृत्रिम धागे वेगळे असतात. त्यांचा पृष्ठभाग ओबडधोबड नसतो. तो अधिक गुळगुळीत असतो. ते जेव्हा गुंफले किंवा विणले जातात तेव्हा त्या उभ्या-आडव्या धाग्यांमध्ये पोकळी राहत नाही. गुळगुळीत पृष्ठभागामुळं अधिक प्रकाश परावर्तित होतो. असा कपडा भिजला तरी पाणी फारसं पोकळीत भरत नाही. प्रकाशाच्या परावर्तित प्रमाणात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे तशा कपड्याचा रंग गडद झाल्याचं जाणवत नाही.






No comments