तुम्हाला माहित आहे का ?5
' पोपटपंछी चतुरकी जान, पढे पहाटे श्रीभगवान' असं आपण कितीही पोपटाचं कौतुक केलं, तरी पोपटपंची का केली जाते, याविषयीच्या आपल्या काही समजुती भ्रामकच आहेत. कारण आपल्या बोलांची सही सही नक्कल करण्यासाठी पोपटांच्या अंगी स्वरयंत्रच नसतं; पण त्यांची श्वासनलिका दुतोंडी असते. त्यामुळे तिच्यातून श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना त्या नलिकेच्या स्वरूपात बदल करून पोपट आवाज काढू शकतात. थोडक्यात, ते शीळ घालत असतात. या शीळेचंच नियंत्रण करून ते निरनिराळे आवाज काढू शकतात. ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता मुळातच पोपटांमध्ये असते. त्यामुळे रानावनात असताना ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करू शकतात. यात पोपटांच्या निरनिराळ्या जातींचा, तसंच त्यांच्या स्वतःच्या जातीचाही समावेश असतो. त्यामुळे मग कोणत्या पक्ष्याला साद घालून जवळ करायचं किंवा कोणाला किंवा डावलून दूर निघून जायचं, हे ठरवणं त्यांना शक्य होतं. आपल्याच जातीच्या दुसऱ्या पोपटाला साद घालून प्रतिसाद देत ते स्वतःच्या प्रदेशांचं रक्षणही करू शकतात. तसंच विणीच्या हंगामात आपला जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना या क्षमतेची मदत होते.
जेव्हा असे पोपट घरात पाळले जातात तेव्हा ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेपोटी मानवी आवाजाची नक्कल करणं त्यांना शक्य होतं. अर्थात, असं करताना ते शब्द मुळात मानवप्राण्याकडून काढले गेले आहेत, अशी मात्र त्याची समजूत नसते. तेराव्या शतकातल्या एका फारसी ग्रंथात, पोपटांना बोलायला कसं शिकवावं, हे सांगितलं आहे. त्यात असं म्हटलं आहे, की ज्या पोपटाला बोलायला शिकवायचं त्याच्यासमोर एक आरसा धरावा. त्या आरशाच्या आड मग त्याच्या मालकानं स्वतःला लपवावं. त्या पोपटाला त्यामुळे आपल्या मालकाचं दर्शन होत नाही. समोरच्या आरशात मात्र त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. त्यामुळं जेव्हा तो मालक काही शब्द उच्चारतो तेव्हा पोपटाला दुसरा एक आपल्यासारखा पक्षीच बोलत असल्याचं वाटून तो त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. त्यापोटीच काही शब्द असे पोपट तसेच्या तसे आपल्या गळ्यातून काढू शकतात. मानवीआवाजाची नक्कल करून आपलं मन रिझवण्याचं काम ते जरूर करतात; पण त्यापायी इतर पक्ष्यांची नक्कल करण्याची किमया ते हरवून बसल्याचं दिसून आलं आहे.
पोपटच फक्त असं करू शकतात, असं नाही. मैना पक्षीही अशी नक्कल करू शकतात. झालंच तर मॉकिंगबर्ड जातीचे इवलेसे पक्षी तर इतर कितीतरी पक्ष्यांची नक्कल करतात. तरीही पोपटांची बुद्धिमत्ता इतर पक्ष्यांच्या मानानं जास्त असल्याचा दावा काही मज्जाशास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळेच काही पोपट केवळ शब्दच नव्हे, तर वाक्यंच्या वाक्य बोलू शकतात. एवढंच नाही, तर त्यांचा अर्थही त्यांना समजत असल्यासारखी त्यांची वागणूक असते.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*
📒 *मुलाचा आवाज का फुटतो?* 📒
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमानं मराठी माणसावर जणू गारूड केलं होतं. त्यातल्या त्या छोट्या छोट्या मुलांनी बड्या बड्या गायकांची गीतं इतक्या तयारीनं गायली होती, की सामान्य रसिक, जाणकार इतकंच काय, पण मान्यवर परीक्षकही भारावून गेले होते. नेहमीच्या परीक्षकांचं काय सांगावं? ते तर त्या मुलांमध्ये त्यांच्यातलेच होऊन मिसळून गेले होते. हसतखेळत त्यांना उत्तेजन देत ते त्यांना त्यांच्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्यांची जाणीव करून देत होते. ते करतानाही त्यांच्या उणिवांबद्दलच न बोलता कोणत्या बाबतीत सुधारणेला जागा आहे, हेच हळुवारपणे, केवळ वयानं लहान असणाऱ्या स्पर्धकांच्या ध्यानात आणून देत होते. म्हणूनच तर परीक्षकांच्या निर्णयावर त्यांचीच काय, पण त्यांच्या पालकांचीही प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली नाही. हे नेहमीचेच यशस्वी काय किंवा मान्यवर परीक्षक काय त्या स्पर्धेतील सीनियर गटातील मुलांना परत परत सांगत होते, की आता तुझा आवाज फुटण्याची वेळ आली आहे. तेव्हा जरा जपून राहा. अनिवार्यपणे होणाऱ्या त्या बदलाला कसं सामोरं जायचं यासंबंधीच्या सूचनाही ते देत होते; पण या सूचना मुलींना दिल्या जात नव्हत्या. त्या फक्त मुलांनाच दिल्या जात होत्या. असं का? मुलांचा आणि मुलांचाच आवाज का फुटतो? वयात येताना मुलं आणि मुली, सर्वांच्याच शरीरामध्ये तसंच शरीरक्रियांमध्ये जे काही बदल होत असतात त्याचाच हा परिपाक आहे. त्या काळात काही संप्रेरकांचा स्राव शरीरात प्रथमच सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली वयात येताना उंची, रुंदी यामध्ये तसंच काही अवयवांच्या आकारात आणि त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत असतात.
मुलांच्या बाबतीत स्वरयंत्र हा त्यातलाच एक अवयव आहे. याचा आकार मोठा होतो. इतका मोठा, की गळ्याच्या बाहेरूनही ते स्वरयंत्र स्पष्टपणे दिसू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये 'अॅडम्स अॅपल' असं म्हणतात. आवंढा गिळताना हे स्वरयंत्र वर-खाली होत असताना स्पष्ट दिसतं. या मोठ्या आकारामुळं त्यातून उठणारे स्वरही आपली बैठक बदलतात. आवाज खर्जाकडे जाऊ लागतो. त्यापायी तो भरदार होतो. त्यामुळे गाण्यासाठी आवाजाची पट्टी बदलते. यालाच 'आवाज फुटणं' असं म्हणतात. मुलींच्या शरीरातील स्वरयंत्राचा आकारही बदलतो; पण तो तितकासा लक्षणीय नसतो. त्यांचा आवाज अधिक वरच्या पट्टीतला होतो; पण त्या बदलत्या पट्टीशी जुळवून घेणं त्यांना तितकंसं कठीण जात नाही. मुलांच्या बाबतीत मात्र हा पट्टीतला फरक जास्त असतो. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना अधिक प्रयास करावे लागतात. फुटलेल्या आवाजात आपली मूळची गायकीची खुमारी राखून ठेवण्यासाठी त्यांना जास्त धडपड करावी लागते.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*
No comments