Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

तुम्हाला माहित आहे का ? 6

📒 *ताप जिभेखाली तापमापक ठेवून का मोजतात?* 📒



ताप मोजण्यासाठी सहसा पाऱ्याचा तापमापक वापरला जातो. त्या मापकाच्या एका टोकाशी असलेल्या फुगीर गोळ्यामध्ये पारा साठवलेला असतो. त्याला उष्णता मिळाली, की तो पारा प्रसरण पावतो व त्या गोळ्याला जोडलेल्या बारीक नळीमधून वर वर सरकू लागतो. त्याच्या प्रसरणाचं मोजमाप करून शरीराचं तापमान मोजलं जातं. पारंपरिक तापमापकांमधल्या त्या नलिकेच्या बाहेरच्या पृष्ठभागावर तापाचे आकडे दाखवलेले असतात. अलीकडे काही डिजिटल तापमापक आले आहेत. त्यांच्यामध्ये नलिकेवरचा आलेख नसतो, तर घड्याळातल्या तबकडीप्रमाणे असलेल्या पडद्यावर ताप दाखवणारे आकडे उमटतात. पाऱ्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक संवेदकाद्वारे ताप मोजणारे मापकही आता तयार झाले आहेत. तरीही बहुतांश तापमापक पाऱ्याच्या प्रसरणाच्या गुणधर्माचाच उपयोग करून घेतात. त्यानं आपलं काम अचूक बजावावं असं वाटत असेल तर मग तो पाऱ्याचा गोळा, ज्याचं तापमान मोजायचं त्या पदार्थानं संपूर्णपणे वेढला जाण्याची आवश्यकता असते. तसं करायचं तर मग शरीराचा उघडा असलेला भाग त्याच्या संपर्कात येऊन चालणार नाही. कारण अशा भागाचं तापमान हवेच्या तापमानामुळं प्रभावित झालं असण्याची शक्यता असते. तेव्हा उघड्यावर असलेला भाग टाळून त्या गोळ्याला सगळीकडून कवटाळेल, असा शरीराचा भाग निवडायचा तर तीन पर्याय सुचतात. पहिला आपली काख. तो भाग उघडा नसतो. काखेत तापमापकाच्या गोळ्याला वेढून टाकतानाच त्याचाही बाहेरच्या वातावरणाशी संपर्क येणार नाही, याची व्यवस्थाही आपोआप होते.

शिवाय तिथं अनावश्यक जोर पडून काचेचा तापमापक फुटण्याची शक्यता फारशी नसते. त्यामुळे खास करून मुलांचं तापमान मोजताना याच भागाचा वापर केला जातो. जिभेच्या खालचा पृष्ठभाग अतिशय नाजूक असतो. त्यामुळे उष्णतेचं वहन तिथून सहजगत्या होतं. साहजिकच तापमानाच्या अचूक मोजमापाला तो भाग जास्त सोईस्कर आहे. प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत ते तापमापक चावून त्याची मोडतोड करण्याची शक्यता नसते. त्यामुळे त्यांचं तापमान मोजण्यासाठी त्या भागाचा वापर डॉक्टर करतात. शिवाय तसं करताना शरीर उघडं करावं लागत नाही. तिसरा पर्याय इस्पितळांमध्ये बऱ्याच वेळा

केला जातो. तो गुदद्वाराचा. तिथं तापमापक ठेवल्यानं अचूक मोजमापासाठी लागणाऱ्या सर्व

शर्ती पूर्ण होतात. अर्थात, लाजेकाजेस्तव त्याचा वापर करणं सहसा टाळलं जातं. तेव्हा अचूक मोजमाप आणि सामाजिक सभ्यता या दोन्हींचा विचार करता जिभेखालची त्वचा हा पर्याय सर्वात योग्य वाटतो.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*

📒पदार्थांचीच अॅलर्जी का होते आणि निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या अॅलर्जी का होतात?* 📒


आपल्या अवतीभवती आपल्या आरोग्याला बाधा आणू शकतील असे एवढे सूक्ष्मजीव वावरत असतात, की आपण जीवाणू, विषाणू, कवक अशा सूक्ष्मजीवांच्या महासागरातच पोहत असतो, असं एका वैज्ञानिकांनी म्हणून ठेवलं आहे. याएवढ्या आणि डोळ्यांनाच काय, पण शक्तिशाली सूक्ष्मदर्शकांची मदत घेतल्यानंतरही दिसून शकणाऱ्या रोगजंतूंशी सामना करायचा म्हणजे तुकोबांनी म्हटलं आहे तसा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'; पण अशा कठीण प्रसंगातही आपलीच जीत व्हावी अशी चोख व्यवस्थाही निसर्गानं केलेली आहे. त्यानं आपल्याला एक अशी सुनियोजित, सुबद्ध आणि कार्यक्षम संरक्षणयंत्रणा बहाल केली आहे, की जणू ती आपली कवचकुंडलंच! या संरक्षणयंत्रणेच्या, इम्युन सिस्टिमच्या पाईक असतात आपल्या रक्तातल्या लिम्फपेशी. निरनिराळ्या लिम्फग्रंथींच्या रूपात यांच्या तुकड्या शरीरात सगळीकडे पसरलेल्या असतात. जिथून जिथून म्हणून रोगजंतूंचा शिरकाव शरीरात होऊ शकतो, अशा सर्व ठिकाणी त्यांचं बस्तान असतं. शिवाय रक्तातल्या पेशींच्या रूपात शरीरभर त्यांची गस्त चालूच असते.

या लिम्फपेशींच्या अंगी आपला कोण आणि परका कोण, याची ओळख पटवण्याची क्षमता असते. प्रत्येक रेणूच्या पृष्ठभागावर त्याची निर्विवाद ओळख पटवणारं विशिष्ट अणूंच्या रचनेच्या रूपातलं ओळखपत्र वाचून लिम्फपेशी आगंतुक पाहुणा मित्र आहे की शत्रू आहे, याचा निवाडा करतात. त्याला पिटाळून लावण्यासाठी काही विवक्षित प्रथिनांची प्रतिपिंडांची निर्मिती व्हायला लागते. ही प्रतिपिंडं त्या त्या ओळखपत्राला प्रतिसाद देणारीच असतात. ती त्या अणूंच्या रचनेला मरणमिठीच मारतात. त्यायोगे तो रेणू तर निकामी होतोच; पण ज्या सजीवाच्या अंगावर तो असतो, त्याचंही मरण ओढवतं.

या साऱ्या प्रकारात काही वेळा काही रेणूंच्या बाबतीत काही लिम्फपेशी अतिउत्साही होतात. त्या रेणूच्या विरोधात त्या जोमदार प्रतिक्रिया करतात. ती गोष्ट आठवते ना! एका राजानं, आपण झोपलेले असताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक माकडाला नेमलं. त्याच्या हाती तलवार दिली. एक माशी नाकावर घोंघावत राजाला त्रास देऊ लागली. कितीही वेळा हाकललं तरी ती जाईना. एकदा ती अशीच नेमकी नाकाच्या शेंड्यावर बसलेली असताना माकडानं तिचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तलवारीचा घाव घातला आणि... तशीच अवस्था या अतिउत्साही लिम्फपेशींची असते. काही विशिष्ट पदार्थांपासून आपलं संरक्षण

करण्यासाठीच त्या कार्यरत होतात; पण उत्साहाच्या भरात त्या अशा काही रसायनांची निर्मिती करतात, की आपल्या श्वासनलिका, रक्तवाहिन्या चोंदून जातात. आपल्याला श्वासोच्छ्वास करणं कठीण होऊन बसतं. रक्तप्रवाहातही अडथळा येतो. हृदयाच्या कामावरही अनिष्ट परिणाम होतो.

ज्याचं संरक्षण करायचं त्या शरीराच्या मुळावरच उठल्यासारखी परिस्थिती होते. यालाच हायपरसेन्सिटिव्हिटी रिअॅक्शन किंवा अॅलर्जी असं म्हणतात. अॅलर्जी का होते, हे जरी आज आपल्याला समजलं असलं, तरी काही पदार्थांची अॅलर्जी का असते, हे गूढ मात्र अजूनही उकललेलं नाही.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*




No comments