Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

तुम्हाला माहित आहे का ? 7

📒 *चांदी काळी का पडते?* 📒


लोखंडाचं भांडं गंजतं. पितळेच्या भांड्यालाही नियमितपणे कल्हई करावी लागते, नाहीतर त्याच्या पृष्ठभागावर अनारोग्याला आमंत्रण देणारी पुटं चढतात. तांब्यांच्या भांड्यावरही हिरवट थर जमतो. हे सर्व होतं, कारण या धातूंचा हवेशी संपर्क आला की त्यातून काही रासायनिक प्रक्रिया घडून येतात; पण चांदी, सोनं किंवा प्लॅटिनम या धातूंच्या भांड्यांवर असला कोणताही कलंक येत नाही. कारण हे धातू नोबल म्हणजेच राजेशाही आहेत. निदान अशी समजूत आहे. प्लॅटिनम आणि सोनं यांच्या बाबतीत हे थोडंफार खरं आहे. थोडंफार अशासाठी, की सोन्याचे दागिनेही अधूनमधून पॉलिश करून घ्यावे लागतात. नाही तर त्यांची झळाळी कमी झाल्यासारखी होते.चांदीच्या बाबतीत तर आणखीच अडचण आहे. चांदीची भांडी, मूर्तीसुद्धा उघड्यावर असल्या तर काळवंडतात. काही तर चक्क काळ्याच होतात. हे असं का होतं? लोखंडासारखी चांदी गंजत तर नाही. मग हे असं का होतं, असा सवाल साहजिकच आपल्या मनात धुमाकूळ घालू लागतो. काही जण याचं खापर त्या चांदीच्या शुद्ध नसण्यावर फोडतात. शंभर टक्के शुद्ध चांदी काळवंडणार नाही, असं छातीठोकपणे सांगतात. ते तरी कितपत खरं आहे? बहुतेक धातूंचा आपल्या मूळ रूपाकडे धाव घेण्याचा कल असतो.

निसर्गात चांदी आर्जेन्टाईट या खनिजाच्या रूपात अस्तित्वात असते. आर्जेन्टाईट म्हणजे सिल्व्हर सल्फाईड हे चांदीचं संयुग आहे. त्यामुळे जेव्हा हवेतल्या सल्फर डाय ऑक्साईड किंवा हायड्रोजन सल्फाईड या वायूंशी चांदीचा संपर्क येतो तेव्हा चांदीचं त्या संयुगात रूपांतर व्हायला मदत होते. त्याचा रंग काळा असल्यामुळं चांदीच्या पृष्ठभागावर जमलेल्या या पुटाच्या काळ्या रंगाखाली मूळ चांदी झाकोळून जाते. सल्फरची संयुगं इतर अनेक पदार्थांमध्ये असतात. चांदीच्या भांड्यांवर जो कागद गुंडाळला जातो त्या कागदात, रबरामध्ये, लोकर यामध्येही सल्फर असतं. रबराच्या टेबलमॅटवर चांदीची भांडी ठेवली तरी ती काळी पडतात. अंडी, मेयॉनेज, काही फळांचे रस, व्हिनेगार, मोहरीचं चाटण, ऑलिव्ह फळं यांसारख्या अन्नपदार्थांमध्येही सल्फरची संयुगं असतात. त्यांच्याशी येणाऱ्या संपर्कामुळेही चांदी काळी पडू शकते. ते टाळायचं असेल तर चांदीच्या भांड्यांचा संपर्क सल्फरच्या संयुगांशी येणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एक तर ती हवाबंद डब्यात ठेवायला हवीत किंवा वापरात असतील तर ती सतत हाताळली पाहिजेत. तशा हाताळण्यानं जो काही सिल्व्हर सल्फाईडचा पुसटसा थर तयार झाला असेल तो घासला जाऊन निघून जातो. म्हणूनच तर नेहमीच्या पूजेतली देवाची चांदीची मूर्ती सहसा काळवंडलेली दिसत नाही. त्याचा त्या देवत्वाशी मात्र काहीही संबंध नसतो.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*


 📒 *आटवलेलं दूध पिवळसर का होतं ?* 📒


दुधाचा समावेश आपण द्रवपदार्थांमध्ये करत असलो तरी ते पाण्यासारखं द्रव नाही. वैज्ञानिक भाषेत त्याला कोलॉइड किंवा कोलॉईडल सस्पेन्शन असं म्हणतात. कारण त्यातल्या पाण्यात निरनिराळे कण विहरत असतात. यातले काही कण प्रथिनांचे असतात. त्यातही कैसिन हे प्रथिन जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचे कण बरेच असतात. त्याशिवाय रिबोफ्लेविन हे जीवनसत्त्व असतं. याचा रंग पिवळा असतो. त्याच्या नावातच या रंगाचा उल्लेख आहे. लॅटिन भाषेत फ्लेवस म्हणजे पिवळा. त्यापासूनच रिबोफ्लेविन हे त्याचं नाव त्याला मिळालेलं आहे. हे मात्र त्या पाण्यात विरघळलेलं असतं पण त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा पिवळा रंग त्या पाण्याला मिळत नाही. याव्यतिरिक्त चरबीचे म्हणजेच मेदाम्लांचे कणही त्या पाण्यात विहरत असतात.

केसिन या प्रथिनात कॅल्शियमची रेलचेल असते. त्यामुळेच दूध अतिशय पौष्टिक बनतं. या केसिनचा रंग पांढरा असतो. झालंच तर त्यातील मेदाम्लांचा रंगही पांढरा असतो. दुधातून जी साय निघते ती या मेदाम्लांची बनलेली असते. तिच्या रंगावरून त्यांच्या पांढऱ्या रंगाची कल्पना यावी. दुधात केसिनचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याचेच कण पाण्यात जास्त विहरत असतात. त्यांच्यावरून परावर्तित होणारा प्रकाश दुधाला त्याचा पांढरा रंग देतो. त्यात भर पडते ती मेदाम्लांच्या कणांच्या सहभागाची. जितकं त्यांचं प्रमाण दुधात जास्त तितका त्याचा रंग पांढराशुभ्र होतो. सामान्य तापमानाला हे सारे कण सहजगत्या पाण्यात विहरत राहतात, ते खाली बसत नाहीत. त्यामुळे मग दुधाचा रंग पांढराच राहतो. शिवाय हे कण कमीत कमी प्रकाश शोषून घेतात. जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे त्याचा पांढरा रंगच आपल्याला दिसतो.

आपण जेव्हा दूध आटवतो तेव्हा त्यातल्या पाण्याची वाफ होऊन ते उडून जातं. त्याचं प्रमाण कमी होतं. त्याचं आकारमान कमी झाल्यामुळे त्यातल्या रिबोफ्लेविनचं प्रमाण वाढतं. रिबोफ्लेविनची घनता वाढल्यामुळे आता त्या पाण्याला त्याचा रंग मिळतो. ज्या पाण्यात केसिन आणि मेदाम्लांचे कण विहरतात त्याचाच रंग पिवळा झाल्यामुळे तोच साऱ्या दुधाचा होतो. गाईच्या दुधात रिबोफ्लेविनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते गोठवल्यावरही पिवळं होतं, कारण त्या पाण्याचे स्फटिक बनतात. उरलेल्या पाण्यातल्या रिबोफ्लेविनची घनता साहजिकच वाढते. त्यामुळे मग त्या पाण्याचा आणि परिणामी दुधाचाच रंग पिवळसर होतो.


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*



No comments