भगतसिंग
भारतमातेसाठी बलीदान करणारर्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणार्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने फाशीला सामोरे गेले.
तत्कालीन परिस्थिती आणि क्रांतीकारकांनी त्यावर काढलेला तोडगा
ख्रिस्ताब्द १९२८ मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून `सायमन कमीशन’ नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. `सायमन परत जा’ च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठीआक्रमणात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून आरक्षक अधिकारी यांच्या निवासस्थानापाशी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव याने संकेत केला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळया झाडून त्याचा बळी घेतला आणि तेथून पलायन केले. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणार्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले. शेवटी २३.३.१९३० या दिवशी भारतमातेच्या या तिन्ही सुपुत्रांना फाशी देण्यात आली.
भगतसिंग यांचा अल्प परिचय
जन्म : भगतसिंग याचा जन्म २७.९.१९०७ या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला.
बालपण : भगतसिंग ६-७ वर्षांचा असतानाची गोष्ट. तो शेतावर गेला असता शेतकरी गहू पेरत असलेला पाहून त्याचे कुतुहल जागृत झाले. त्याने विचारले “शेतकरीदादा, तुम्ही या शेतात गहू का टाकत आहात ?” शेतकरी म्हणाला, “बाळ, गहू पेरले की, त्याची झाडे होतील आणि प्रत्येक झाडाला गव्हाची कणसेच कणसे येतील.” त्यावर तो म्हणाला, “मग जर बंदुकीच्या गोळया या शेतात पेरल्या, तर त्याचीही झाडे उगवतील का ? त्यालाही बंदुका येतील का ?” `या गोळया कशाला हव्यात’, असे शेतकर्याने विचारल्यावर `हिंदुस्थानचे राज्य बळकावणार्या इंग्रजांना मारण्यासाठी’, असे क्षणाचा विलंब न करता त्याने आवेशपूर्ण उत्तर दिले.
युवावस्था : पुरेसे महाविद्यालयीन शिक्षण, घरातील सर्व परिस्थिती अनुकूल असतांनाही त्यांनी देशसेवेसाठी आजन्म अविवाहित रहाण्याची प्रतिज्ञा केली आणि ती निभावूनही नेली. ते `नौजवान भारत सभा’, `कीर्ती किसान पार्टी’ आणि `हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनांशी संबंधित होते.
प्रखर देशप्रेम दर्शाविणारे प्रसंग
प्रसंग १ : फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर भगतसिंग आपल्या आईला म्हणाले, “आई, काळजी कशाला करतेस ? मी फाशी गेलो, तरी इंग्रज सत्ता येथून उखडून टाकण्यासाठी एका वर्षाच्या आत पुन्हा जन्म घेईन !”
प्रसंग २ : फाशी जाण्याआधी एका सहकार्याने भगतसिंग यांना विचारले, “सरदारजी, फांसी जा रहे हो । कोई अफसोस तो नही ?” यावर गडगडाटी हसून भगतसिंग म्हणाले, “अरे, या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना `इन्किलाब झिंदाबाद’ ही घोषणा सर्वत्र पोहोचावी, एवढा एकच विचार केला होता. ही घोषणा माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या कंठातून निघाली की, तो घोष या साम्राज्यावर घाव घालीत राहील. या छोट्या आयुष्याचे याहून मोठे काय मोल असेल ?”
No comments